
जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन संशयितांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अमळनेर शहर परिसरात झालेल्या घरफोड्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेशातील २१ वर्षीय नवळसिंग वन्सिंग अलावा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून दुसरा संशयित केरू ऊर्फ केहर इडिया डाबर याची माहिती समोर आली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुसरा संशयित मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट तालुक्यातील रहिवासी आहे. दोन्ही संशयितांना अमळनेर येथे आणून संबंधित गुन्ह्यांत अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी तीन गुन्ह्यांची उकल केली. या कारवाईत चांदीच्या गणपतीची मूर्ती, चांदीची लक्ष्मीची मूर्ती, सोन्याच्या गोळ्या, चांदीचे तुकडे, चांदीची भांडी, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे कडे, वाळ्या आणि इतर दागिने असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक नरळकर कोते आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अमळनेर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून संशयितांना अटक केली.
या कारवाईमुळे अमळनेर शहरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.





