बातम्याअमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवत घटस्थापना; १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

१९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ

जळगाव लाईव्ह न्यूज । आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात मंगळ होरा या शुभ मुहूर्तावर रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त त्रिशुलात्मक भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांच्या मंदिरासमोर विधिवत पूजाअर्चा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी अतिजागृत भूमिमातेच्या मूर्तीवर सहस्र पुष्पार्चनही करण्यात आले.

घटस्थापनेचे यजमान शुभम वैष्णव गुरुजी सपत्नीक उपस्थित होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, यश जोशी व तुषार दीक्षित यांनी पौरोहित्य केले. चंद्रकांत जोशी यांनी ढोलकीवर साथ दिली, तर उमेश पाठक यांनी सहकार्य केले. भूमिमातेच्या मूर्तीवर पुरोहित जयेंद्र वैद्य यांनी सहस्र पुष्पार्चन केले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज अर्चन व सामूहिक आरती

सोमवार, दि. १२ ते रविवार, दि. १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६.३० वाजता शहरातील महिला मंडळांच्या वतीने सामूहिक आरती होईल.

१९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी यज्ञाचे दोन सत्रांत आयोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२, तर दुसरे सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. सायंकाळी यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button