जळगाव जिल्हा

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

पथनाट्यातून तणाव व्यवस्थापन, गैरसमज व सामाजिक कलंक दूर करण्याचा संदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे जळगाव खुर्द येथे मानसिक आरोग्य जनजागृती रॅली व प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर संदेश देत मानसिक आरोग्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले.

यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवांचे श्रवण: खरे आवाज, खरा बदल या विषयावर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवांना व्यासपीठ मिळवून देणे, मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि सामाजिक कलंक कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.पथनाट्यातून तणावाचे योग्य व्यवस्थापन, मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनशैली आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांची मदत घेण्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.

मानसिक आजार हा लपविण्याचा विषय नसून त्यावर योग्य उपचार व समुपदेशन उपलब्ध असल्याचा सकारात्मक संदेशही नागरिकांना देण्यात आला.या उपक्रमाला जळगाव खुर्दमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या रॅली व पथनाट्यामुळे परिसरात मानसिक आरोग्याबाबत संवाद आणि जागरूकता निर्माण झाली.हा उपक्रम मानसिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख प्रा. अश्विनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सहयोगी प्रा. हेमांगी मुर्कुटे, विभागातील प्राध्यापक वर्ग आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.‘मनाची काळजीही तितकीच महत्त्वाची’ हा संदेश देत समाजात संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button