जळगाव जिल्हाहवामान

जळगावमध्ये निसर्गाचा ‘डबल गेम’; दिवसा राज्यात सर्वाधिक तापमान, पहाटे सर्वात कमी पारा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातून पावसाने निरोप घेतला असला, तरी यंदा परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पारा वाढला आहे. काल शुक्रवारी जळगाव शहरात राज्यामध्ये सर्वाधिक उच्चांकी ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.ज्यामुळे दिवसभर सूर्य आग ओकत होता आणि तीव्र ‘ऑक्टोबर हिट’चा फटका नागरिकांना बसला. मात्र, यातच शुक्रवारी पहाटे जळगावात राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली.

२ ऑक्टोबर रोजी जळगावात पहाटे १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे किमान तापमान कमी नोंदले गेले. त्यामुळे जळगावमध्ये सध्या ‘दिवसा ऑक्टोबर हिट आणि पहाटे गारठा’ असे विरोधाभासी हवामान पाहायला मिळत आहे.

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात जळगावचे कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

आगामी काही दिवसात जळगावचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात जळगावकरांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, दिवसाच्या तापमानात वाढ झाली असली तरी दुसरीकडे रात्रीच्या तापमानात मात्र घसरण झाल्याने जळगावकरांना काहीसा गारवा जाणवत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जळगावचे किमान तापमान २० अंशाखाली आले आहे. विशेष म्हणजे, यंदा जळगावच्या किमान तापमानाने २० अंशांचा टप्पा तब्बल आठ दिवस आधीच ओलांडला आहे. २०२५ मध्ये किमान तापमान २० अंशांच्या खाली जाण्यासाठी १० ऑक्टोबर उजाडला होता. मात्र, यंदा २ ऑक्टोबरलाच पारा १८.२ अंशांवर घसरल्याने शहरात अकाली थंडीची चाहूल लागली आहे.

सध्या दिवसा वाढते तापमान आणि पहाटे जाणवणारा गारवा यामुळे जळगावच्या हवामानात सध्या मोठा विरोधाभास निर्माण झाला असून, पुढील काळात तापमानाचा हा चढ-उतार कसा राहतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button