पाचोरा

ग्रामसभेत प्रश्न विचारणे भोवलं? माजी सरपंचाकडून तरुणाला मारहाण; VIDEO व्हायरल

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातून लोकशाहीच्या व्यासपीठाला काळिमा फासणारी संतापजनक बातमी समोर येत आहे. जारगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला माजी सरपंचाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा (NC) नोंदवण्यात आला आहे.

जारगाव येथे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी यंत्राच्या विषयावरून चर्चा सुरू असताना एका सुजाण तरुणाने प्रशासकीय कामांविषयी थेट जाब विचारला. यावरून माजी सरपंच आणि त्या तरुणादरम्यान जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या माजी सरपंचाने भरसभेत त्या तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.

भरसभेत घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.या मारहाणीनंतर संबंधित तरुणाने पाचोरा पोलीस ठाणे गाठून सुनील पाटील यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

माजी सरपंचांचा वेगळाच दावा

या प्रकरणावर बोलताना माजी सरपंच सुनील पाटील यांनी वैयक्तिक वादाचा संदर्भ दिला. “संबंधित तरुणाच्या घरातील सांडपाणी सातत्याने माझ्या प्लॉटमध्ये सोडले जाते, ज्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे,” असा दावा त्यांनी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button