चाळीसगाव

उत्पादन भरघोस, दर मात्र कवडीमोल! चाळीसगावातील शेतकऱ्याने उभ्या वांग्यावर फिरवला ट्रॅक्टर

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे कोरड्या दुष्काळाची भीषण परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे काही उत्पादित शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने आता उभे पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे पेठ येथील शेतकरी नानासाहेब भाईदास पाटील यांना याच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. वांग्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने त्यांनी तब्बल सहा महिन्यांचे उभे पीक ट्रॅक्टर फिरवून काढून टाकले.

नानासाहेब पाटील यांनी यंदा १ एप्रिल रोजी आपल्या शेतात वांग्याची लागवड केली होती. योग्य नियोजन, मेहनत आणि काळजी घेत त्यांनी वांग्याचे जोमदार पीक घेतले. पीक चांगले आल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळाले. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती.

मात्र, बाजारात वांग्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. मिळणारा भाव हा उत्पादनासाठी झालेला खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्याने पीक काढणी, वाहतूक आणि विक्रीचा खर्च करणेही आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली.

अखेर नानासाहेब पाटील यांनी आपल्या शेतातील उभ्या वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी सहा महिन्यांच्या मेहनतीने उभे केलेले पीक काढून टाकले.

उत्पादन चांगले असूनही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला उभे पीक नष्ट करण्याची वेळ येणे, ही शेतमालाच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी घटना आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button