जळगाव जिल्ह्यातील १५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचा यशस्वी पाठपुरावा

सप्टेंबर 26, 2026 1:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील बहुतांश भागात दीर्घ पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यानंतर राज्यभरातून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत असतानाच, राज्य सरकारने राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या महत्त्वाच्या निर्णयात जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

dushkal jalgaon

राज्य सरकारने ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या भागांत शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातीळ एकूण ३५८ पैकी तब्बल २६५ तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले असून, हे प्रमाण सुमारे ७५ टक्के इतके आहे.

दरम्यान, राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळ यादीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, यावल आणि पारोळा या सर्व १५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलतींचा लाभ केंद्र सरकारच्या दुष्काळ निकषांनुसार (‘ट्रिगर-१’ नुसार) जाहीर झालेल्या या दुष्काळामुळे आता जळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीत स्थगिती, वीज बिलात सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामांची तीव्रता वाढवणे यासह विविध शासकीय सवलती आणि आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now