जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर शहरातील जुन्या नगरपालिका रोड परिसरात दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या दोघा चोरट्यांच्या अवघ्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक आरोपी हा फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा असल्याचे तपासात समोर आले आहे.

रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, ता. व जि. जळगाव, ह.मु. सिलवासा, जि. नगर हवेली) असं अटक केलेल्या चोरट्यांचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील मधुसुदन मेडिकलसमोर, जुनी नगरपालिका रोड येथे राहणाऱ्या कल्पना सुभाष वाणी (वय ६२, व्यवसाय- अंगणवाडी सेविका) या नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून अहीरवाडी येथे कामानिमित्त गेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता त्यांना घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. घरात शोध घेतला असता ५० हजार रुपये रोकड, २ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी २० सप्टेंबर रोजी रावेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले. दिवसा चोरी झाल्यामुळे तपासात काही तांत्रिक अडचणी आल्या, परंतु एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले होते. याच फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
त्यानंतर रितेश नेवे आणि गजेंद्र चौधरी यांना २१ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता, रितेश नेवे हा फिर्यादी कल्पना वाणी यांच्या बहिणीचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीचा मागील काही वर्षांपासून संपर्क नसल्याची माहिती तपासात समोर आली. वाणी या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती असल्याने त्याचा फायदा घेत रितेश नेवे याने मित्र गजेंद्र चौधरीच्या मदतीने घरफोडी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली. या कालावधीत केलेल्या चौकशीत पोलिसांनी गुन्ह्यातील ३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.








