जळगावात पावसाची जोरदार एंट्री! आजही येलो अलर्ट ; गेल्या २४ तासांत कुठे किती बरसला पाऊस?

सप्टेंबर 13, 2026 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर । मागील एक ते दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज रविवारीही जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम असून, हवामान खात्याकडून जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

rain 1

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवू लागला आहे. या हवामान प्रणालीला पूरक परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही दिसून येत असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रावेर तालुक्यात सर्वाधिक ६७.५ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ धरणगावमध्ये ३५ मिमी, भडगावमध्ये २८ मिमी, एरंडोलमध्ये २८ मिमी, जळगावमध्ये २४ मिमी, चोपड्यात २१ मिमी, पाचोऱ्यात २० मिमी, अमळनेरमध्ये १९ मिमी, पारोळ्यात १६ मिमी, मुक्ताईनगरमध्ये १६ मिमी, भुसावळमध्ये ९.२ मिमी, बोदवडमध्ये ६ मिमी, यावलमध्ये ५.५ मिमी आणि चाळीसगावमध्ये ३ मिमी पावसाची नोंद झाली. जामनेरमध्ये मात्र पावसाची नोंद झाली नाही.

आज रविवारी सकाळपासूनच जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पावसाची प्रतीक्षा असलेल्या पिकांनाही या पावसामुळे मोठा आधार मिळाला आहे.

धरणसाठ्यात रातोरात १३ टक्क्यांची वाढ

दरम्यान, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालानुसार, १० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ५७.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी रात्री ७ ते ११ वाजेच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात मोठी भर पडली.

या पावसाचा परिणाम म्हणून १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांचा सरासरी उपयुक्त पाणीसाठा थेट ७०.९६ टक्क्यांवर पोहोचला. अवघ्या एका रात्रीत जिल्ह्यात १३.०६ टक्के म्हणजेच सुमारे १५०.३० दलघमी (५.३१ टीएमसी) नवीन पाणीसाठ्याची भर पडली आहे.

वाघूर धरणाची पाणीपातळीही वाढली

जळगाव शहरासह परिसराची तहान भागविणाऱ्या वाघूर प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी ८८.७६ टक्के असलेला पाणीसाठा वाढून ९२.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरणात सध्या २८३.५१ दलघमी म्हणजेच १०.०१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही सुधारत आहे. मात्र, काही भागांत अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now