जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ–भादली रेल्वेमार्गादरम्यान गोदावरी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजजवळ प्रस्तावित असलेला रेल्वे थांबा तातडीने मंजूर करून सुरू करण्यात यावा, अशी मागणी गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केली. या थांब्याला ‘बहिणाबाईनगर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

वैद्यकीय महाविद्यालय व गोदावरी हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकांची ये-जा असते. मात्र, या भागात रेल्वे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ किंवा भादली स्थानक गाठावे लागते. त्यामुळे वेळेसोबतच अतिरिक्त प्रवासाचा खर्चही सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या रेल्वे थांब्यासाठी तब्बल १५ वर्षांपूर्वी, म्हणजेच २१ एप्रिल २०११ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर २७ मे २०११ रोजी रेल्वे बोर्डाने पत्राद्वारे महाव्यवस्थापक आणि भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रस्तावाची तपासणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप या प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.
खासदार स्मिता वाघ यांनीही या रेल्वे थांब्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा केला असल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रलंबित प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
भुसावळ–भादलीदरम्यान ४३५ ते ४३६ किलोमीटरच्या परिसरात हा रेल्वे थांबा देणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित ठिकाणाजवळ गोदावरी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज तसेच विविध शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय परिसरातील सात गावांसाठीही हे ठिकाण महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी केंद्र ठरणार आहे. रेल्वे थांबा सुरू झाल्यास ९० हजारांहून अधिक नागरिकांसह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी भुसावळ किंवा भादली स्थानक गाठावे लागते. त्यामुळे वेळेसोबतच अतिरिक्त प्रवासाचा खर्चही सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.






