जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून याच दरम्यान, नेरी नाका चौक परिसरात मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी रोकड आणि मेडिकल साहित्य लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

पेट्रोल पंपाजवळील जे. एस. मेडिकलला दोन चोरट्यांनी लक्ष्य केले.चोरट्यांनी मेडिकलचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील अंदाजे १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच मेडिकलमधील विविध साहित्य आणि वस्तूही चोरून नेल्याची माहिती आहे.

सीसीटीव्हीत चोरी कैद
सकाळी मेडिकलमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक अनुराग रमेश पारप्यानी यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
दरम्यान, चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये दोन चोरटे दुकानात शिरून चोरी करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.










