सर्वसामान्यांना दिलासा! ऐतिहासिक उच्चांकानंतर साखर दरात मोठी घसरण, गूळही झाला स्वस्त..

ऑगस्ट 30, 2026 9:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने परदेशातून तयार साखर आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्यात किलोमागे सुमारे १५ रुपयांची, तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांची घट झाली आहे.

sugar jagger

गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत होती. श्रावणातील सण-उत्सवांमुळे घरगुती ग्राहकांसह विविध प्रक्रिया उद्योगांकडून साखरेची मागणी वाढली होती. त्यामुळे ग्राहकांना साखरेसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. आता मात्र आयात साखरेला परवानगी मिळाल्याने बाजारातील साखरेची उपलब्धता वाढू लागली आहे.

जूनपासून दरवाढीचा सिलसिला

गेल्या हंगामातील कमी साखर उत्पादन आणि पावसाला झालेल्या विलंबामुळे नवीन हंगामातील साखर उत्पादन उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती वाढली आणि जूनपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ झाली. साखरेच्या दरवाढीचा परिणाम गुळाच्या बाजारावरही झाला होता.

मात्र, आता सरकारने आयात साखरेला परवानगी दिल्याने बाजारातील उपलब्धता वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यांसारख्या सणांमुळे साखर आणि गुळाची मागणी वाढणार असतानाच दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

साखरेसाठी नवी १५ दिवसांची कोटा पद्धत

साखरेच्या बाजारातील साठेबाजी आणि अतिरिक्त खरेदीला आळा घालण्यासाठी सरकारकडून सप्टेंबरपासून नवीन कोटा पद्धत लागू करण्याची तयारी आहे. सध्या असलेल्या मासिक कोट्याऐवजी १५ दिवसांची कोटा पद्धत लागू केली जाणार आहे.

या पद्धतीनुसार, साखर कारखान्यांना निश्चित केलेल्या कोट्यापैकी ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार आहे. उर्वरित साखर पुढील आठवड्यात विकावी लागेल. त्यामुळे बाजारातील साखरेचा पुरवठा नियंत्रित ठेवण्यास तसेच साठेबाजीवर लक्ष ठेवण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

गरज भासल्यास सरकारकडून अतिरिक्त कोटाही जारी केला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दर आणखी स्थिर होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now