एथरची नवी ‘कोणार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! 200 किमीपर्यंत रेंज मिळणार अन् किंमत..

ऑगस्ट 29, 2026 5:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही नवीन एथरची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. एथर एनर्जीने (Ather Energy) आपली अत्यंत बहुचर्चित आणि नवी ‘एथर कोणार्क’ (Ather KONARC) स्कूटर अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने ही स्कूटर नव्या ईएल प्लॅटफॉर्मवर विकसित केली असून, मेटल बॉडीसह अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्ट रिमोट आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजीमुळे ही स्कूटर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Ather new Konark

एथर कोणार्कची सुरुवातीची किंमत १ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर एस-लाइन आणि झी-लाइन अशा दोन सीरिजमध्ये उपलब्ध होणार आहे. एस-लाइनमध्ये चार पर्याय, तर झी-लाइनमध्ये दोन पर्याय देण्यात येणार आहेत.

एस-लाइनमधील १०० किमी रेंजच्या व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे. १२५ किमी रेंज असलेल्या मॉडेलची किंमत १.२१ लाख रुपये, तर १६१ किमी रेंजच्या व्हेरिएंटची किंमत १,४४,९९९ रुपये आहे. उर्वरित व्हेरिएंट्सच्या किमती कंपनीकडून नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरू

१२५ किमी आणि १६१ किमी रेंज असलेल्या एस-लाइन मॉडेल्सची डिलिव्हरी सप्टेंबर २०२६पासून सुरू होणार आहे. १०० किमी रेंजच्या बेस मॉडेलची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. तर २०० किमी रेंजचे मॉडेलही पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.झी-सीरिजच्या डिलिव्हरीला २०२७च्या दुसऱ्या तिमाहीत सुरुवात होणार आहे.

मेटल बॉडी आणि २०० किमीपर्यंत रेंज

‘कोणार्क’ ही मेटल बॉडीसह येणारी एथरची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एस-लाइनच्या टॉप मॉडेलमध्ये २०० किमीपर्यंतची रेंज देण्यात येणार आहे. स्कूटरचा टॉप स्पीड ७० किमी प्रतितासपर्यंत आहे. झी-लाइनमध्ये IDCनुसार १६१ किमीपर्यंत रेंज मिळणार असून, या मॉडेलचा टॉप स्पीड ८० किमी प्रतितास असेल.

काय आहेत फीचर्स?

एस-लाइनमध्ये चार तर झी-लाइनमध्ये पाच रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. एंट्री लेव्हल कोणार्कमध्ये २.१ kWh बॅटरी, मिड-रेंज व्हेरिएंटमध्ये २.७ kWh आणि टॉप व्हेरिएंटमध्ये ३.५ kWh बॅटरी देण्यात आली आहे. स्कूटरला युनिबॉडी चेसिस मिळते. यामध्ये ऑटो होल्ड, फॉल सेफ, एअरवॉक, ब्लूटूथ कॉल आणि म्युझिक अलर्ट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. एथर कोणार्कमध्ये कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह थेफ्ट आणि टो अलर्ट, फाइंड माय स्कूटर आणि OTA अपडेट्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये ३१ लिटरची अंडरसीट स्टोरेज क्षमता असून USB Type-C चार्जिंग पोर्टही मिळतो.

याशिवाय TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हॉइस कंट्रोल, फुल-फ्लेज्ड नेव्हिगेशन, पॉटहोल अलर्ट आणि क्रॅश अलर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. की-लेस इग्निशन, की-लेस बूट रिलीज आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधांमुळे दैनंदिन वापर अधिक सोयीचा करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now