जळगाव लाईव्ह न्यूज । ऑगस्टचा महिना आता संपण्याच्या मार्गावर असून, अवघ्या दोन दिवसानंतर सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नवीन महिना सुरू होताच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित काही महत्त्वाचे बदल होणार आहे. स्वयंपाकघरातील LPG सिलिंडरपासून कार खरेदी आणि परदेश प्रवासापर्यंत या बदलांचा परिणाम जाणवू शकतो.

एलपीजी सिलेंडरच्या किमती
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किंमती जाहीर केले जातात. त्याचनुसार १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमती देखील जाहीर केल्या जातील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरातील खर्चावर होईल. १ ऑगस्ट रोजी, कंपन्यांनी १९-किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२०२ ने कमी केली, परंतु १४.२-किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत मात्र स्थिर राहिल्या.

LPG ई-केवायसीची अंतिम मुदत
LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ देण्यात आली आहे. IOCL, BPCL आणि HPCL यांनी ही मुदत आधीच्या २३ ऑगस्टच्या डेडलाइनवरून वाढवली आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास भविष्यात सिलिंडरच्या वितरणाशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
CNG-PNG आणि विमान इंधनाचे दर
नवीन महिन्याच्या सुरुवातीला ATFच्या दरात बदल होऊ शकतो. विमान इंधनाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम विमान प्रवासाच्या तिकिटांवर होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे CNG आणि PNGच्या दरातही बदल होण्याची शक्यता असल्याने वाहनचालक आणि घरगुती ग्राहकांच्या खर्चावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कार आणि SUV महागण्याची शक्यता
नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही सप्टेंबरमध्ये महत्त्वाची बातमी आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेडकडून १ सप्टेंबरपासून कार आणि SUVच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.या संभाव्य वाढीचा परिणाम पेट्रोल-डिझेलवरील ICE वाहनांसोबत इलेक्ट्रिक वाहनांवरही होऊ शकतो.
परदेश प्रवासातील इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेतही बदल होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास करताना बोर्डिंग पासवर इमिग्रेशनचा शिक्का घेण्याची गरज राहणार नाही. मोबाइलवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रत दाखवून प्रक्रिया पूर्ण करता येईल.यामुळे विमानतळावरील कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेळेची बचत करणारी ठरण्याची शक्यता आहे.









