राज्यात बंदी असतानाही तस्करी! सावदा पोलिसांनी पकडला लाखोंचा अवैध गुटखा

ऑगस्ट 28, 2026 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात बंदी असतानाही सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर सावदा पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी एका कारमधून ५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा विमल, गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून कारचालकाला अटक करण्यात आली आहे.

crime 2 jpg webp

ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता करण्यात आली. सावदा पोलिसांना राखाडी रंगाच्या होंडा अमेझमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री ११.०४ वाजता संशयित कार (एमएच-१९-सीव्ही-४४४५) येताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली.

कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल) याची चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला.

प्राथमिक चौकशीत हा माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती आहे. भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा आणला होता का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांच्या पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now