जळगाव लाईव्ह न्यूज । आधीच महागाईने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले असताना गेल्या काही दिवसांत साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली होती. साखरेचा भाव तब्बल ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साखरेच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागला असून, अवघ्या आठवडाभरात दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली आहे.

साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असताना दर कमी झाल्याने घरगुती खर्चाचा काहीसा भार हलका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशीच साखरेच्या दराने सर्वसामान्यांचे तोंड गोड केले आहे.

दरात झालेल्या घसरणीमुळे राज्यात तसेच देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघानेही साखरेची उपलब्धता पुरेशी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर साखर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील साखर कारखाने, घाऊक व्यापारी, वितरक तसेच मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर करणारे औद्योगिक ग्राहक यांच्या साठ्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेद्वारे संबंधितांकडे प्रत्यक्षात किती साखर उपलब्ध आहे, साठा नियमानुसार ठेवण्यात आला आहे का आणि बाजारातील दरवाढीमागे कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारातील हालचालींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.










