जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. सुरुवातीला उत्तम स्थितीत असलेली पिके आता पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांसाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात कोणत्याही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नसल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

ऑगस्टमध्ये आतापर्यंत केवळ ९२ मिमी पाऊस
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत अत्यंत तुटपुंजा ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्येही तब्बल ५० मिमी पाऊस केवळ १ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पडला होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक सरी कोसळल्या असून, १० आणि ११ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे काही भागातील पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर पाऊस लांबल्यास पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजामुळे चिंता वाढली
पुढील काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची पिके कशीतरी तग धरून आहेत; परंतु पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या मार्गावर आहे.आगामी काळात खरीप पिकांची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पाऊस लांबला तर उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती आहे.
सोयाबीन, मूग, उडदाला शेंगा लागण्याचा काळ
यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्याही उशिरा झाल्या. सध्या सोयाबीन, मूग आणि उडीद ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच काळात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील मका आणि कापूस पिकांनाही पाण्याची मोठी गरज आहे. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने या पिकांची वाढ खुंटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे आता आकाशाकडे डोळे लागले आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला तर खरीप पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो; अन्यथा पावसाअभावी खरीप हंगामावर संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.









