
जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील पिंप्री शिवार व परिसरात १५ ते २० शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. केबल चोरी करताना पुरवठा खंडित करण्यासाठी पेटीतील कटाऊट व मेन स्वीचची नासधूस करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

एकाच रात्री पिंप्री, तराई पट्टी, मंगरूळचा काही भाग व परिसरातील विविध शेतांमध्ये विद्युतपंपांच्या केबलवर चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आला. केबल चोरी झाल्यानंतर पिकांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. शिवाय नवीन केबल खरेदी व दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरात यापूर्वी सुद्धा केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. काही प्रकरणांचा तपास करून चोरट्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले. दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जाणे धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आहे. याचाच चोरटे गैरफायदा घेत आहेत. पोलिसांनी पिंप्रीसह परिसरातील शिवारात गस्त वाढवून केबल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली. काहींनी आंदोलनाचा इशारा दिला.

चोरट्यांनी मंगरूळ शिवारातील गट क्र. २४९ या उषा युवराज महाजन यांच्या शेतातील कूपनलिकेतील केबल चोरली. त्याआधी पेटीतील कटाऊट, मेन स्वीचची तोडफोड केली. पिंप्री येथील अशोक रामू महाजन यांनी तक्रार दाखल केली. आहे. तसेच काही ठिकाणी केबल चोरताना अडसर ठरणारी कूलनालिकेतील पीव्हीसी पाइपच्या केसिंग तोडफोड करण्यात आली आहे. अशा ठिकाणी संपूर्ण पाइप बाहेर काढून पुन्हा वीज जोडणी देणे खर्चिक ठरते.










