जळगावात चोरट्या महिलांकडून दुकान फोडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात

ऑगस्ट 24, 2026 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीसमोरील नाल्यालगत असलेल्या जनरेटर दुरुस्तीच्या दुकानात अज्ञात महिलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दुकान बंद असल्याचा फायदा घेत महिलांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करत त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानमालकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला गेला.

dcd

मिळालेल्या माहितीनुसार, नेरी नाका परिसरात जनरेटर दुरुस्तीचे दुकान आहे. दुकान बंद असताना काही संशयित महिला दुकानाच्या परिसरात आल्या. त्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण हालचाल दुकानमालकाच्या मोबाईलवर निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच दुकानमालकाने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच तीन ते चार संशयित महिलांनी तेथून पळ काढला. मात्र, त्यापैकी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, यापूर्वीही याच दुकानात चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुकानमालक परिसरावर लक्ष ठेवून होते. दुकानातील कॉपर वायर तसेच इतर महागड्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे दुकानासमोरच महापालिकेचा कचरा डेपो असल्याने या महिला कचरा वेचण्याच्या बहाण्याने मोठ्या पिशव्या घेऊन परिसरात आल्याचेही दिसून आले. त्यामुळे कचरा वेचण्याच्या नावाखाली दुकानाची पाहणी करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी करण्यात येत आहे. तसेच पसार झालेल्या इतर संशयित महिलांचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now