शनिपेठ पोलिसांकडून दुचाकी चोराचा पर्दाफाश; तीन मोटारसायकली जप्त

ऑगस्ट 23, 2026 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीला गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकल चोरीचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन बजाज पल्सर आणि एका होंडा युनिकॉन अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ddc

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी बालाजी पेठ येथून अज्ञात चोरट्याने बजाज पल्सर मोटारसायकल चोरून नेली होती. फिर्यादी निलेश प्रकाश बोरसे (वय २७, रा. बालाजी पेठ, जळगाव) हे बाहेरगावी गेले होते. ते १८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर मोटारसायकल दिसून न आल्याने त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मोटारसायकल आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने बालाजी पेठ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताची माहिती मिळवली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी एरंडोल बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत केली. त्याचबरोबर त्याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या आणखी एका पल्सरसह एकूण दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉन मोटारसायकल, अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांबाबत पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहेत.

यांनी केली कारवाई :

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांचा सहभाग होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now