जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरणच्या जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याण येथील कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. जळगाव मंडळातील वीज वितरणाचा उडालेला बोजवारा, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे वाढलेले प्रमाण, ६७ कोटींहून अधिक थकबाकी आणि वीज चोरीच्या तब्बल २,१६९ प्रकरणांवरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्थेचा वरिष्ठ पातळीवरून आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. मंडळातील विविध भागांत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे वाढलेले प्रमाण, ग्राहकांकडील कोट्यवधींची थकबाकी, तसेच वीज चोरीची अनेक प्रकरणे प्रलंबित असतानाही त्यावर अपेक्षित पद्धतीने कारवाई झाली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता म्हणून विनोद पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत हे निलंबन करण्यात आले आहे.

वीज चोरी आणि ६७ कोटींहून अधिक थकबाकीचा भार
जळगाव मंडळाच्या कार्यक्षेत्रात वीज चोरीची तब्बल २,१६९ प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर प्रभावी कारवाई न झाल्यामुळे महावितरणच्या महसुलावर थेट परिणाम झाला. तसेच, जळगाव मंडळातील ग्राहकांकडील वीज बिलांची थकबाकी ६७ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रभावी नियोजन आणि सातत्याने पाठपुरावा करण्यात अपयश आल्याने ही कारवाई अटळ ठरली.
मंडळातील विविध भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांना दीर्घकाळ वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागले. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबतही समाधानकारक कामगिरी झाली नसल्याचे वरिष्ठ पातळीवर नोंदविण्यात आले.
महावितरणच्या कर्मचारी सेवा विनियमातील तरतुदींनुसार विनोद पाटील यांना निलंबित करण्यात आले असून, निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच निलंबन काळात त्यांना प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी नाशिक येथे हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







