बापरे! नशिराबादमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्याच घरावर सशस्त्र दरोडा! रिव्हॉल्वर अन् सुरा दाखवत लुटीचा प्रयत्न, पण..

ऑगस्ट 20, 2026 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच दोन अज्ञात दरोडेखोरांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या नशिराबाद येथे बुधवारी रात्री घडली. एकाने रिव्हॉल्वर ताणून धरत दुसऱ्याने महिलेच्या गळ्याला सूरा लावत रोकड, दागिन्यांची मागणी केली. मात्र, पोलिसाने स्वतःला बाथरुममध्ये कोंडून घेत डायल ११२ वरुन पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

jalgaon mahanagar palika 52 jpg webp

काय आहे घटना?

नशिराबाद येथील भादली रोडवरील मुक्तेश्वरनगर परिसरात पोलिस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. कोळी हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाइकाचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी ते नशिराबाद येथे आले होते. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी अचानक त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात शिरताच एका दरोडेखोराने गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्याला सुरा लावला, तर दुसऱ्याने रिव्हॉल्वर ताणून धरत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड देण्याची मागणी केली. दरोडेखोरांनी कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली.

घटनेच्या वेळी गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व हातात अंगठ्या होत्या. दरोडेखोरांचे लक्ष जाताच त्यांनी तात्काळ स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. संतापलेल्या दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. परिस्थिती अत्यंत बिकट आणि हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, कोळी यांनी बाथरूममधूनच अत्यंत शांत डोक्याने डायल ११२ या पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळाल्याने घटनास्थळी मदत पोहोचण्याची चाहूल दरोडेखोरांना लागली. पोलिसांचा सुगावा लागताच दोघे दरोडेखोर घाईघाईने तेथून पसार झाले. दरोडेखोरांनी घरातील टेबलवर पडलेली गणेश कोळी यांच्या कारची (एमएच ०५ क्यु ७१२१) चावी उचलली आणि ते कार घेऊन थेट भादली रोडने सुसाट पळाले. पोलिस मागावर असल्याचे समजताच दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारातील अंधारात कार सोडून दिली आणि शेतातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, दोन्ही संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांच्या तावडीतून कुटुंबीय बचावले असून, या घटनेने नशिराबाद परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now