धक्कादायक ! भुसावळात व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून २ लाखांची रोकड लुटली

ऑगस्ट 18, 2026 9:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असताना त्यातच लुटमारीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, धान्य व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून २ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर परिसरात सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे.

crime

मिळालेल्या माहितीनुसार, धान्य व्यापारी अजय प्रेमचंद कोटेचा (वय ५०, रा. टीव्ही टॉवर परिसर) हे सोमवारी रात्री सुमारे ८.५० वाजता अण्णा भाऊ साठे मार्केटमधील दुकान बंद करून पुतण्या मीत कोटेचा (वय १९) याच्यासोबत दुचाकीने घरी निघाले होते. रात्री सुमारे ९ वाजता भूमि अभिलेख कार्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

टीव्ही टॉवर परिसरातील बंद पथदिव्यांमुळे रस्त्यावर अंधार होता. याचाच फायदा घेत लुटारूंनी अचानक अजय कोटेचा यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली. डोळ्यांना काहीच दिसत नसल्याने लुटारूंनी त्यांच्यावर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील दोन लाखांहून अधिक रुपयांची रोकड असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून तिघे दुचाकीवरून फरार झाले.

मारहाणीत कोटेचा यांच्या डोळ्यांसह डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना बेशुद्धावस्थेत जळगाव येथील न्यूरो सर्जनकडे उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. भरवस्तीत घडलेल्या या रस्तालुटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लुटीपूर्वी पाळत ठेवल्याचा संशय

लुटारूंनी व्यापारी कोटेचा यांच्या हालचालींवर आधीपासून पाळत ठेवली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. ते दररोज कोणत्या मार्गाने घरी जातात आणि दुकान किती वाजता बंद करतात, याची माहिती आरोपींनी मिळवली असण्याची शक्यता आहे. दुकान व घर भरवस्तीत असल्याने लुटीचा धोका टाळण्यासाठी आरोपींनी पथदिवे बंद असलेल्या अंधाऱ्या ठिकाणाची निवड केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपींची संख्या तीन असली तरी त्यांना अन्य साथीदार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

“या पद्धतीने झालेल्या रस्तालुटीच्या घटनांची माहिती घेतली जात आहे. मोडस ऑपरेंडीच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल,” अशी माहिती डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिली. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके शहरातील प्रमुख रस्ते, बाहेर जाणारे मार्ग तसेच आडवाटांवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील पोलिस गस्तही वाढवण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now