जळगाव लाईव्ह न्यूज । ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने पाचोरा शहराचा परिसर आज अक्षरशः शिवमय झाला. पाचोरा कावड यात्रा सेवा समितीच्या वतीने आयोजित कावड यात्रेत बांबरुड (महादेवाचे) येथून हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, भक्तिभावाने पदयात्रा काढली.

या पवित्र कावड यात्रेचे स्वागत करण्यासाठी मा. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने निर्मल सीड्ससमोर भव्य स्वागत मंडप उभारण्यात आला होता. कावड यात्रेतील भाविकांचे आगमन होताच आपुलकीने स्वागत करण्यात आले. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच केशरयुक्त व बदाममिश्रित गरम दूधाचा प्रसाद वाटप करण्यात आला.

विशेष म्हणजे, केवळ स्वागत आणि सेवा न करता मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वतः आपल्या खांद्यावर कावड घेत पदयात्रेत सहभागी होत ‘हर हर महादेव’चा जयघोष केला आणि देवाचे नामस्मरण केले. त्यांच्या या भक्तिभावपूर्ण सहभागाने उपस्थित भाविकांमध्येही उत्साह आणि श्रद्धेची ऊर्जा निर्माण झाली.
कावड सेवा समितीच्या या भक्तिमय उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून, सातत्याने सुरू असलेल्या या सेवाकार्याचे कौतुक करत मा. वैशालीताईंनी सर्व आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो भाविकांचे शब्दसुमनांनी स्वागत व अभिनंदन केले. ‘भगवान महादेवाच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले सौभाग्य आहे,’ अशी भावना व्यक्त करत त्यांनी कावड यात्रा सेवा समितीचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी गोविंद शेलार, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, सुनील पाटील, संदीप जैन, समाधान पाटील, शरद पाटील, भाऊसाहेब पाटील,साधना देशमुख, ज्योती चौधरी, पिंकी जिनोदिया, कुंदन पांड्या यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.












