‘हरित जळगाव’ साठी टीएम नगरात मियावाकी, नक्षत्र उद्यानाची मुहूर्तमेढ; तीन हजार देशी वृक्षांची लागवड

ऑगस्ट 10, 2026 6:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी महानगरपालिकेने ‘हरित जळगाव शहर’ संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. धुळे-भुसावळ महामार्गालगतच्या टी एम नगर येथील मोकळ्या जागेत जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध देशी व औषधी गुणधर्म असलेल्या सुमारे तीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

plant tree

यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, महानगरपालिका सभापती चंद्रशेखर पाटील, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनीषा घाटगे, विविध प्रभागाचे नगरसेवक यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते.

19 प्रभागांत 25 जागांची निवड-
‘हरित जळगाव शहर’ उपक्रमांतर्गत महानगरपालिकेने शहरातील 19 प्रभागांमध्ये 25 जागा हरित क्षेत्र विकासासाठी निश्चित केल्या आहेत. या ठिकाणी केवळ वृक्षारोपण करण्याऐवजी लावलेली झाडे जगविणे, स्थानिक प्रजातींची निवड, खुल्या जागांचे संरक्षण तसेच जलसंधारणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

हीट ॲक्शन प्लॅनमधून उष्णतेच्या धोकादायक भागांचा अभ्यास-
शहरासाठी तयार करण्यात आलेल्या हीट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून उष्णतेचा अधिक धोका असलेले भाग तसेच या भागांची उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार भविष्यात आवश्यक उपाययोजना आखण्यात येणार आहेत.

मियावाकी पद्धतीने शहराला हिरवाईची कास-
टी एम नगर येथील खुल्या जागेत मियावाकी पद्धतीसह नक्षत्र उद्यानाची संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून शहरातील मोकळ्या जागांना हिरवाईची किनार देण्याबरोबरच जैवविविधतेला चालना देण्याचा प्रयत्न आहे. टी एम नगर येथून सुरू झालेली ही हरित मोहीम महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now