जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने भुसावळ-दादर आणि साईनगर शिर्डी-बिकानेर या विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ–दादर साप्ताहिक विशेष रेल्वेचा परिचालन कालावधी यापूर्वी ३१ जुलैपर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रवाशांचा सातत्याने वाढणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन या गाडीचा कालावधी आता २५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०४९ दादर–भुसावळ साप्ताहिक विशेष रेल्वेचाही परिचालन कालावधी २५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे या मार्गावर दोन्ही दिशांनी मिळून एकूण १६ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.

त्याचबरोबर गाडी क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ९ आणि १६ ऑगस्ट रोजी धावणार आहे. तर गाडी क्रमांक ०४७१५ बिकानेर–साईनगर शिर्डी विशेष रेल्वे ८ आणि १५ ऑगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण चार अतिरिक्त विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी त्यांच्या वेळापत्रकात, मार्गावरील थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व गाड्या पूर्वीप्रमाणेच निश्चित वेळेनुसार धावतील. त्यामुळे प्रवाशांनी जाहीर वेळापत्रकानुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








