आसोदा उड्डाणपूल प्रकरणाची नितीन गडकरींकडून गंभीर दखल; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश

ऑगस्ट 6, 2026 5:56 PM

खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव लाईव्ह न्यूज । धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील आसोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेची केंद्रीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचे तसेच जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली.

gadkari wagh

उड्डाणपूल खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता.

खासदार स्मिता वाघ यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जळगावातील उड्डाणपुलांच्या प्रस्तावालाही गडकरींची सकारात्मक भूमिका

दिल्लीतील भेटीदरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या अडचणींचा मुद्दाही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडला. शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल किंवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली.

या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले. हे प्रकल्प मार्गी लागल्यास जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांवर नियंत्रण मिळविण्यास आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता आधुनिक वाहतूक सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.”;

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now