जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीकरिता जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या एकूण २७ संधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असून त्यांना प्रतिमहा ९,००० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर ६,००० रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या पेटिएम(PAYTM) पेमेंट सर्विस लिमिटेड, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड, एचडीएफसी बँक, मारिको लिमिटेड या नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध असून याकरिता पात्रता दहावी, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे किंवा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० येथे संपर्क साधावा. तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.







