जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील एका मुलींच्या शाळेबाहेर गुप्तपणे लहान आकाराचे मोबाईल विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. दामिनी पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी काही दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये पाळत ठेवल्यानंतर हा प्रकार समोर आला. या कारवाईत काही विद्यार्थिनींकडून छोटे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेबाहेर तात्पुरते स्टॉल लावून काही व्यक्ती अतिशय लहान आकाराचे मोबाईल गुप्तपणे विकत असल्याचे दामिनी पथकाच्या निदर्शनास आले. केवळ ९०० ते १००० रुपये किंमत असलेले हे फोन आकाराने अत्यंत छोटे असल्याने पालक व शिक्षकांच्या सहज लक्षात येत नसत. इतकेच नव्हे, तर हे व्यक्ती मुलींना स्वतःच्या मोबाइलवरून अनोळखी व्यक्ती किंवा मुलांशी संपर्क साधून देत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

दामिनी पथकाने तत्परता दाखवत काही विद्यार्थिनींकडून हे मिनी मोबाइल जप्त केले आहे. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शाळा प्रशासन व संबंधित पालकांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात देत योग्य ते समुपदेशन करण्यात आले. शालेय क्यातील मुलींना अशा आमिषांना बळी पडण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.








