जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळहून नशिराबादकडे येणाऱ्या पिकअपला नशिराबाद टोलनाक्याजवळ मागून भरधाव ट्रॉलाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सोनू रामा बागले (वय २७, रा. भवानीनगर, नशिराबाद) असं मयत तरुणाचं नाव आहे.

सोनू बागले हा मजुरीचे काम आटोपून पिकअपमधून (क्रमांक एमएच- १९, बीएफ ६००१) नशिराबादकडे घरी येत होता. नशिराबाद टोलनाक्याजवळ त्याच्या पिकअपला मागून येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक जीजे- १५, एजे- ४६२९) जोरदार धडक दिली. यात सोनू हा पिकअपमधून खाली फेकला गेल्याने व ट्रॉलाच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सोनू बागले हे हातमजुरी आणि बांधकामावर बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार असून, कुटुंबाचा आधारवडच हिरावला गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.









