जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू किशोर तडवी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपीने घरात असलेली दारू पत्नीच्या अंगावर ओतून तिच्यावर पेटती काडी फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आणि ती गंभीररीत्या भाजली.
महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखत आग विझवली. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी राजू किशोर तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करत आहेत.












