जळगाव लाईव्ह न्यूज | सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तीन विशेष एकेरी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–दानापूर, मिरज–समस्तीपूर आणि भुसावळ–समस्तीपूर या विशेष गाड्या भुसावळमार्गे धावणार असून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

भुसावळ–समस्तीपूर विशेष (गाडी क्र. ०११८३) ही गाडी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता भुसावळ स्थानकातून सुटणार आहे. या गाडीला खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–दानापूर विशेष (गाडी क्र. ०१०८१) ही गाडी ५ ऑगस्ट रोजी पहाटे १२.३० वाजता मुंबईहून सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे या गाडीला थांबे असतील.
तर मिरज–समस्तीपूर विशेष (गाडी क्र. ०१४८१) ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता मिरजहून सुटणार असून मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी आणि जबलपूरसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात बिहार आणि उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, नियमित गाड्यांवरील अतिरिक्त ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.







