जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त

ऑगस्ट 3, 2026 5:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. अस्वच्छ हॉटेल्स, प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि दूषित दूध याविरोधात झालेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच हॉटेलचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

fda 1

एफडीएने जिल्हाभरात प्रतिबंधित गुटख्याविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत २२ ठिकाणी धाडी टाकत ३८ लाख १३ हजार ४९३ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी २८ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

याशिवाय अन्नसुरक्षा मोहिमेदरम्यान प्रिझर्व्ह फूड, तूप, बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल, मिठाई आणि दूध यासह विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यात आले. या कारवाईत १६ प्रकरणांमध्ये १६ लाख ३ हजार ९१६ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दूध विक्रीतील गैरप्रकारांवरही एफडीएने कठोर भूमिका घेत ५०४ लिटर दूषित दूध नष्ट केले. या दुधाची किंमत सुमारे २६ हजार ४८७ रुपये असल्याची माहिती विभागाने दिली. दूषित दूध बाजारात पोहोचण्यापूर्वीच नष्ट करण्यात आल्याने ग्राहकांच्या आरोग्यावरील संभाव्य धोका टळला.

दरम्यान, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनापरवाना व्यवसाय, उघड्यावर अन्न विक्री आणि नियमभंगाच्या ७७ प्रकरणांमध्ये ५ लाख २४ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला.

तपासणीदरम्यान अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छ स्वयंपाकगृहे, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आवश्यक सुधारणा केल्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची कायदेशीर जबाबदारी आहे. पुढील काळातही जिल्हाभरात अशाच प्रकारच्या तपासण्या सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परवाना निलंबन, रद्द करणे तसेच फौजदारी कारवाईसह कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now