शालार्थ आयडी घोटाळा ! एका ‘फोन कॉल’ने डिस्चार्ज रद्द करून संजय गरुड पुन्हा रुग्णालयात; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

ऑगस्ट 2, 2026 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी संजय गरुड याला वाचवण्यासाठी आता राजकीय चक्रे वेगाने फिरू लागल्याची चर्चा आहे. १ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन गरुडला न्यायालयात हजर करण्याची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र, काही वेळातच तो डिस्चार्ज रद्द करून त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घडामोडीनंतर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा रंगली असून संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sanjay garud

माहितीनुसार, 28 जुलै रोजी अटकेनंतर संजय गरूड यांना थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 ऑगस्ट रोजी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू होती. त्यानुसार सुरुवातीला डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र ऐनवेळी एका वजनदार नेत्याचा फोन धडकला आणि आरोग्य यंत्रणा कमालीची तणावात आली. एका डॉक्टरांनी दिलेल्या डिस्चार्जच्या पत्रावर दुसऱ्या आरोग्य अधिकाऱ्याने तातडीने खाडाखोड करत गरुडला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात ‘अॅडमिट’ करून घेतल्याची चर्चा आहे

या घडामोडीमुळे न्यायालयात हजर करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला आरोपीशिवाय न्यायालयात जावे लागले. न्यायालयात गरूड यांच्या वतीने वैद्यकीय कारणे आणि वयाचा आधार घेत कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे गरुडला वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पोलिसांना ‘फ्री हॅन्ड’ दिला असतानाही, राजकीय दबावामुळे ही संपूर्ण चौकशी पहिल्यांदाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गरुड यांना नेमकं कोण वाचवतंय? यावरून आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड हा महत्त्वाचा सूत्रधार मानला जातो. त्याच्या चौकशीतून अनेक शिक्षण संस्थाचालक आणि ‘बडे मासे’ पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता होती. मात्र, अटकेपासून आतापर्यंत त्याची पोलीस कोठडीत कोणतीही ठोस चौकशी झालेली नाही. जर तपासाविनाच गरुडला जामीन मिळाला, तर या घोटाळ्यातील इतर बड्या हस्तकांचाही सहजरीत्या बचाव होईल. या राजकीय हस्तक्षेपामुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now