जळगाव लाईव्ह न्यूज । कोणतीही आपत्ती झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच त्यानंतर निर्माण होणारी परिस्थितीही तितक्याच सक्षमपणे हाताळावी लागते, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे आज यांनी सांगितले.

पूरानंतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते किंवा पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी वापरावे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ड्राय रेशनच्या व्यवस्थेसाठी सेवाभावी संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.सर्पदंश, श्वान दंश व विंचूदंशाच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक औषधांचा साठा सर्व ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून यासाठी संबंधित कर्मचारी कार्यरत आहेत.
नागरिकांनी स्वतः सुरक्षित राहावे तसेच कोणताही प्रश्न किंवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, जेणेकरून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता नागपूर एन डी आर एफ चे तीन अधिकारी व 31 जवान मदत बचाव कार्य व जनजागृती करिता जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिली आहे.







