मुसळधार पावसानंतर जळगावात आज हवामान कसे असेल?

ऑगस्ट 1, 2026 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२६ । गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली, तर शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मात्र, शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असून आता जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (१ ऑगस्ट) जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

rain jpg webp

गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात १०४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस अनेक वर्षांतील विक्रम मोडणारा ठरला आहे. ‘एल निनो’च्या वर्षात प्रथमच जिल्ह्यात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. याआधी १ जुलै २००७ रोजी ९६ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसाने तो विक्रमही मागे टाकला आहे.

विशेष म्हणजे, २००६ नंतर प्रथमच जिल्ह्यात २४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार ७ ऑगस्ट २००६ रोजी १८६.३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली होती. गेल्या २६ वर्षांतील (२००० नंतर) अतिवृष्टीच्या घटनांमध्ये यंदाचा पाऊस चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

यंदाच्या पावसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. यापूर्वी बहुतांश वेळा काही तालुक्यांपुरताच पाऊस मर्यादित राहत होता, तर इतर भागांत पावसाची तूट जाणवत होती. यावेळी मात्र जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक वर्षांनंतर समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून अनेक लघु प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या दृष्टीने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज
१ ऑगस्ट : जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता.
२ आणि ३ ऑगस्ट : पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता; अतिवृष्टीचा धोका कमी.
४ ऑगस्ट : काही मोजक्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now