जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने गिरणा धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे.

पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. ३१ जुलै २०२६) सायंकाळी ५ वाजता गिरणा प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग ७,४२८ क्युसेक्सवरून वाढवून १४,८५६ क्युसेक्स (४२०.४७ क्युमेक्स) करण्यात आला आहे.

यासाठी गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ ते ६ प्रत्येकी ६० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, गिरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत अथवा कमी होत राहिल्यास त्यानुसार धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट करण्यात येईल. त्यामुळे नदीपात्रात किंवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.






