अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा

जुलै 31, 2026 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजनी धरणातून सुमारे ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

anjani dam

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये तसेच पूरस्थितीचा अंदाज घेण्याच्या उद्देशाने नदीकाठावर गर्दी करू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटारपंप, कृषी अवजारे व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय नदीपात्रालगत विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे, यंत्रसामग्री व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून, सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now