जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून अशातच चाळीसगाव तालुक्यातील गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा ९७.०६ टक्क्यांवर पोहोचल्याने आज (३१ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशानुसार धरणातील पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन सुरुवातीला १,००० ते २,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

सध्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १०,००० ते १५,००० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पुढील काही तासांत पाण्याची आवक वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पशुधन, शेतीतील मोटार पंप, गुरेढोरे तसेच इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नदीपात्रात सुरू असलेल्या विविध विभागांच्या बांधकामांशी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांनी बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री व इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल. प्रशासनाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







