जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधारमुळे आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणातून ९० हजार ८६५ क्युसेक (२,५७३ क्युमेक्स) वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे तापीला पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

धरणाचे ३६ दरवाजे गेट उघडण्यात आले असून, त्यापैकी ८ गेट १.५० मीटर तर २८ गेट १.०० मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, कालव्यामधून २०० क्युसेक (५.६६ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

सकाळी ८ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी २११.९६० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २७९.०० दशलक्ष घनमीटर (७१.९१ टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १४६.५० दशलक्ष घनमीटर (५७.२५ टक्के) इतका झाला आहे.
गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान २५८ मिमी इतके झाले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







