जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक आणि कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटरला ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या कारवाईनंतर भूमिअभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरु असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे

नेमके काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील संशयित राहुल ताराचंद कोळी (३२) हे भूमिअभिलेख विभागात भूकरमापक म्हणून कार्यरत असून, कल्पेश सोमनाथ पाटील (३२) हा कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे. जळगाव तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याने गट क्रमांक ६ मधील शेतजमिनीच्या गट हिस्सा व पोटहिस्स्याच्या पडताळणीसह मोजणीसाठी भूकरमापक कार्यालयात नियमानुसार अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही कामाचा निपटारा करण्यासाठी भूकरमापक राहुल कोळी याने तक्रारदाराकडे त्यांच्या भावाच्या उपस्थितीत ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकऱ्याने १७ जुलै रोजी जळगाव ‘एसीबी’कडे लेखी तक्रार नोंदवली. एसीबीने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत लाचेच्या मागणीला दुजोरा मिळाला. याच दरम्यान कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर कल्पेश पाटील यानेही नोटीस पाठवण्याच्या नावाखाली ६२५ रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचे समोर आले.
ठरल्याप्रमाणे बुधवारी भूकरमापक राहुल कोळी हा एका खासगी मदतनीसासह प्रत्यक्ष मोजणीसाठी शेतकऱ्याच्या शेतात गेला. मोजणी पूर्ण झाल्यावर त्याने तक्रारदाराला करंज (ता. जळगाव) येथील बसस्थानकाजवळ बोलावले. तेथे त्याने स्वतःसाठी व कार्यालयासाठी: ₹७०,०००, दोन वेळा नोटीस पाठविल्याबाबत ₹१,२०० आणि खासगी मदतनीसासाठी: ₹५०० अशी एकूण ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. करंज बसस्थानकाजवळ आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही संशयितांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच ताब्यातील संशयितांना अटक करण्यात येणार आहे. लाचेची मागणी, त्यामागील कारणे तसेच यापूर्वी अशा प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळले गेले होते का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







