जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, आज बुधवारी सकाळच्या आकडेवारीनुसार धरण ९२.२५ टक्के भरले आहे. त्यामुळे धरण आता शंभरीकडे वेगाने वाटचाल करत असून जिल्हावासियांच्या पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

मागच्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या काही दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली, विशेष १८ जुलै २०२६ रोजी केवळ ४०.२७ टक्के असलेला धरणातील पाणीसाठा आज २९ जुलैपर्यंत थेट ९२.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अवघ्या १२ दिवसात गिरणा धरणाचा जलसाठा जवळपास ५२ टक्क्यांनी भरला आहे. सध्याची स्थिती पाहता आणखी पाऊस झाल्यास धरण लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव या आठ तालुक्यांतील प्रमुख नगरपालिका, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावांचा पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. धरणातील साठा ९२ टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आणि पाणीकपातीचे संकट सध्या तरी टळले आहे.
गिरणा धरण जळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धरणातील वाढता जलसाठा शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक ठरत असून खरीपनंतर आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता अधिक सक्षम होणार आहे.







