जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे यार्डात रेल्वे मार्गावरील डीडीएस (डबल डिस्प्लेसमेंट स्विच) पॉइंट बदलण्याचे महत्त्वाचे तांत्रिक काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने भुसावळ विभागातून पुण्याकडे धावणाऱ्या काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२१३६ नागपूर–पुणे एक्स्प्रेस १ ऑगस्ट रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे हडपसर ते पुणे हा प्रवास रद्द करण्यात आला आहे. तसेच गाडी क्रमांक ११४०६ अमरावती–पुणे एक्स्प्रेस हीदेखील १ ऑगस्ट रोजी हडपसर येथेच प्रवास समाप्त करेल.

याशिवाय गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस, जी ३१ जुलै रोजी जम्मूतवी येथून सुटणार आहे, तीदेखील पुणेऐवजी हडपसरपर्यंतच धावेल. या गाडीचाही हडपसर–पुणे दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यावरून जळगाव, भुसावळामार्गे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२१३५ पुणे–नागपूर एक्स्प्रेस २ ऑगस्ट रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरून सायंकाळी ५.४५ वाजता सुटणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी हडपसर स्थानकावरूनच गाडीत प्रवेश करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुणे यार्डातील या तांत्रिक कामामुळे रेल्वे मार्गांची क्षमता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. भविष्यात वाढत्या रेल्वे वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पॉइंट्स आणि ट्रॅक यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जात आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती, सुटण्याचे स्थानक आणि वेळ याची खात्री रेल्वेच्या अधिकृत माध्यमातून करूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.







