जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. सुरत आणि गुजरात भागातून जळगाव-भुसावळमार्गे बिहार व उत्तर प्रदेशकडे धावणाऱ्या तीन प्रमुख विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

या तिन्ही विशेष रेल्वेगाड्या नंदुरबार, जळगाव आणि भुसावळ मार्गे धावत असल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे सणासुदीच्या काळातील अतिरिक्त गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे.

या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
वलसाड–दानापूर विशेष गाडी : पूर्वी २७ जुलैपर्यंत धावणारी ही गाडी आता ३१ ऑगस्टपर्यंत धावणार आहे.
दानापूर–वलसाड विशेष गाडी : पूर्वी २८ जुलैपर्यंत असलेली सेवा आता १ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
उधना–झंझारपूर विशेष गाडी : पूर्वी २६ जुलैपर्यंत धावणारी ही गाडी आता १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
झंझारपूर–उधना विशेष गाडी : पूर्वी २७ जुलैपर्यंत असलेली सेवा आता १४ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहील.
उधना–मधुबनी विशेष गाडी : पूर्वी २६ जुलैपर्यंत धावणारी ही गाडी आता १३ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०९०४६ मधुबनी–उधना विशेष गाडी : पूर्वी २७ जुलैपर्यंत असलेली सेवा आता १४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जळगाव, भुसावळ आणि परिसरातील उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सणासुदीच्या काळात प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.







