चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हे राज्य शासनाचे प्रमुख ध्येय असून लोकांच्या गरजा ओळखून गुणवत्तापूर्ण विकासकामे राबविण्यात येत आहेत. चाळीसगावमध्ये आज झालेली विविध विकासकामे नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ५८.९४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित मुख्य लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री श्पाटील बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन लोकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींचे समाज कौतुक करतो. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे राज्यभर विकासकामांना गती मिळाली आहे. धरणगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमुळे तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली असून अशाच प्रकारे सर्व भागांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे साकार झाली आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे शक्य झाली. शेतकरी समृद्ध होणे ही शासनाची प्राथमिकता असून त्यांच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नागरिकांच्या सहकार्यामुळे शहर व तालुक्यात अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण होत आहेत. आगामी काळात चाळीसगावमध्ये जिल्हास्तरीय विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुक्याच्या प्रगतीसाठी शेतकरी समृद्ध होणे आवश्यक असून पुढील दोन महिन्यांत सात बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले.
यावेळी नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत, रायगड व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह, प्रांताधिकारी कार्यालय व निवासस्थान, नोंदणी सेवा तीर्थ, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच नवीन टाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आदी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. सुपे, तहसीलदार प्रशांत पाटील, विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











