जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे अर्धा जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या दहा दिवसांत विक्रमी वाढ झाली आहे. १८ जुलै रोजी केवळ ४०.२७ टक्के असलेला धरणातील पाणीसाठा आज २७ जुलैपर्यंत थेट ८६.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव या आठ तालुक्यांतील प्रमुख नगरपालिका, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावांचा पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. धरणातील साठा ८६ टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आणि पाणीकपातीचे संकट सध्या तरी टळले आहे.

जुलैच्या मध्यापर्यंत धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, नाशिकच्या पाणलोट क्षेत्रातून झालेल्या जोरदार आवकेमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. आज २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याची पातळी ३९६.७५८ मीटरवर पोहोचली असून जिवंत साठा ४५१.७५३ घनमीटर आणि एकूण साठवण ८६.२९ टक्क्यांवर नोंदविण्यात आली.
सध्या धरणाचे सर्व रेडियल गेट्स बंद असून सांडव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. सिंचन आउटलेट आणि पीएलबीसी कालव्यामधूनही पाणी सोडण्यात आलेले नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास गिरणा धरण लवकरच शंभर टक्के क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








