चिंचोली उपकेंद्रामुळे सात गावांना मोठा दिलासा; उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास नवीन वीज उपकेंद्र उभारणार
जळगाव लाईव्ह न्यूज । “रात्रीच्या वीजेची धास्ती संपवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात उजेड आणणे ही केवळ योजना नसून शासनाची शेतकरी हिताप्रती असलेली ठाम बांधिलकी आहे. ‘दिवसा वीज’ ही शेतकऱ्यांच्या जीवनात नवा विश्वास निर्माण करणारी संकल्पना आहे. जिथे शेतकऱ्यांची गरज, तिथे शासनाची विकासकामे पोहोचलीच पाहिजेत. उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास डीपीडीसीच्या माध्यमातून नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येईल,” अशी घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. ते चिंचोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात एमएसकेव्हीवाय २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ एमव्हीए अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आधुनिक, सक्षम आणि विश्वासार्ह वीज व्यवस्था ही शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचा भक्कम पाया आहे. जळगाव जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेती अधिक सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ झाली असून उत्पादनक्षमतेतही सकारात्मक वाढ होत आहे. चिंचोली परिसरात उन्हाळ्यात वाढलेल्या वीजभारामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते.

महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे काम मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केल्यामुळे चिंचोली, उमाळा, धानोरी, धानवड, देव्हारी, कुसुंबा आदी सात गावांतील शेतकरी, ग्रामस्थ तसेच औद्योगिक ग्राहकांना अधिक सक्षम, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे. गेल्या पाच वर्षांत डीपीडीसीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी विक्रमी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यातही शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून अशा लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्राला अखंड, दर्जेदार व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून समन्वयाने व तत्परतेने काम करण्यात येईल. वीजपुरवठ्याबाबत उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांनी केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या विविध वीज विकासकामांची माहिती दिली. तसेच, ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकरी तसेच औद्योगिक ग्राहकांना होणाऱ्या लाभाविषयी सविस्तर माहिती देत, परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व विश्वासार्ह होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी मानले.
यावेळी परिसरातील सरपंच तसेच जळगाव ग्रामीण औद्योगिक असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील वीज सुविधा सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.








