अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत

जुलै 27, 2026 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी एका वाहन चोराला जेरबंद करत त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकल्स जप्त करण्यात आल्या आहेत.अमोल राजेंद्र ढमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) असं अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे.

pcd

जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदीचे खेडगाव येथे जळगाव रोडलगत शेतातील शेडमध्ये लपून बसलेल्या अमोल ढमाळे याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या ताब्यातून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. तपासात आरोपी मास्टर की च्या सहाय्याने प्रामुख्याने बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची चोरी भडगाव पोलीस ठाणे, पाचोरा पोलीस ठाणे आणि एमआयडीसी वाळूज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. जप्त करण्यात आलेल्या चारही बजाज प्लॅटिना मोटारसायकलींची अंदाजे किंमत प्रत्येकी ३० हजार रुपये असून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सपोनि प्रदीप शेवाळे, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, तसेच विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांच्या पथकाने पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now