जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असला तरी अद्याप मुसळधार पाऊस झालेला नाही. मात्र, आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) २७ ते २९ जुलै या कालावधीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर जवळपास दोन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने सुकून चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांची वाढ चांगली होत असून जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
तथापि, जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या तुलनेत सुमारे २३ टक्के पावसाची तूट कायम आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी वर्तविलेला मुसळधार पाऊस झाल्यास ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी पाच दिवस वातावरण कसे राहणार
दिनांक आणि वातावरणाची स्थिती
२७ जुलै : जोरदार वादळी वाऱ्यांसह ठरावीक ठिकाणी जोरदार पाऊस (यलो अलर्ट)
२८ जुलै : जोरदार वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस (यलो अलर्ट)
२९ जुलै : जोरदार वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस (यलो अलर्ट)
३० जुलै : ढगाळ वातावरण, ठरावीक तालुक्यांमध्ये मध्यम ते हलका पाऊस
३१ जुलै : ढगाळ वातावरण, ठरावीक तालुक्यांमध्ये मध्यम ते हलका पाऊस







