दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिस सतर्क; सोशल मीडियावर २४ तास सायबर वॉच

जुलै 24, 2026 5:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना, जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. . फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चिथावणीखोर, आक्षेपार्ह अथवा अफवा पसरविणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक २४ तास कार्यरत करण्यात आले आहे.

cyber

दिल्लीतील आंदोलनाशी संबंधित विविध पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणत्याही प्रकारची अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारा मजकूर प्रसारित होऊ नये, यासाठी तांत्रिक माध्यमातून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

यासाठी सायबर शाखेच्या १० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, सोशल मीडियावरील पोस्ट, रील्स, व्हिडिओ आणि संदेशांची चोवीस तास पडताळणी केली जात आहे. संशयास्पद किंवा भडकाऊ स्वरूपाचा मजकूर आढळल्यास त्याची तातडीने चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव पोलिसांनी यापूर्वीही सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट आणि अकाउंट्सवर कारवाई केली होती. त्याच धर्तीवर सध्याच्या संवेदनशील परिस्थितीतही सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी नागरिकांना, विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांना, कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले.

संवेदनशील परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी सायबर देखरेख अधिक प्रभावी केली असून, सोशल मीडियावरून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now